Sunday, August 7, 2011

मेघदूता’चे मराठी अवतार


‘मेघदूता’चेमराठीअवतार




शोभना आगाशे - रविवार, १७ जुलै २०११
रम्य अशा पावसाळी दिवसांत कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण आल्याशिवाय कशी राहील? भगवद्गीता व मेघदूत हे बुद्धिवंत व रसिक मराठी मनाचे विशेष आवडते छंद आहेत. भगवद्गीतेचे विवेचन, विश्लेषण व त्यावरील भाष्य अगदी ज्ञानोबांपासून ते लोकमान्य टिळक, विनोबापर्यंत व त्यानंतरही अनेक व्यासंगी व चिंतनशील विचारवंत सतत करीत आले आहेत. त्यामानाने ‘मेघदूत’चे वेड थोडे अलीकडचे आहे. गेल्या सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांत ‘मेघदूत’चे अनेक मराठी अवतार-अनुवाद झाले आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकरांपासून डॉ. श्रीखंडे, कात्रे, सबनीस, ना. ग. गोरे, वसंतराव पटवर्धन, चिंतामणराव देशमुख, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, शांता शळके, द. वें. केतकर, अ. ज. विद्वांस इत्यादींपर्यंत विविध क्षेत्रांतील नामवंत शास्त्री, सॉलिसिटर, डॉक्टर, न्यायाधीश, कवी, अर्थतज्ज्ञ, राजकारणी, शास्त्रज्ञ व्यक्तींनी मेघदूताचा मराठी काव्यानुवाद करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. असे असले तरी माझ्या माहितीप्रमाणे केवळ पाचेक व्यक्तींनीच म्हणजे चिंतामणराव देशमुख, पंडित ग. वि. कात्रे, बा. भ. बोरकर, द. वें. केतकर व अ. ज. विद्वांस यांनी मेघदूताच्या मूळ ‘मंदाक्रान्ता’ या वृत्तातच मराठीतून काव्यानुवाद केला आहे. इतरांनी निरनिराळ्या जातिवृत्तांतून जसे- साफी, समुदितमदता किंवा मुक्तछंदामध्ये अनुवाद केलेले आढळतात. पण  रा. श्री. जोग व वसंत बापट यांसारख्या समीक्षकांनी म्हटल्याप्रमाणे इतर जातिवृत्तांमध्ये अनुवाद कितीही सुंदर असले तरी त्यांची तुलना या काव्याचा मूळ आकृतिबंध जे ‘मंदाक्रान्ता’ वृत्त आहे, त्याच वृत्तात केलेल्या अनुवादाशी होऊच शकत नाही. मूळ काव्याचा जो विशेष या आकृतिबंधात आहे, त्याचा खरा नखरा किंवा मिजास जास्त परिणामकारक या वृत्तातूनच व्यक्त होते. म्हणून या मूळ काव्याच्या एका श्लोकाचा मराठीत परिचय वर उल्लेखिलेल्या पाच कवींच्या अनुवादातून करून द्यावयाचे या लेखात योजिले आहे.

मूळ संस्कृत श्लोक (वृत्त -मंदाक्रांन्ता) पुढीलप्रमाणे-
।। संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियाया:।।
।। संदेशं मे हर धनपतिक्रोध विश्लेशितस्य।।
।। गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां।।
।। बाह्य़ोद्यानस्थित हरशिरश्चंद्रिका धौतहम्र्या।।
गद्यार्थ- हे मेघा, संतप्तांचा, व्यथितांचा तू निवारा आहेस. स्वामींच्या शापामुळे मी माझ्या सखीचा विरह फार कष्टाने सहन करतो आहे. तेव्हा माझा निरोप तेवढा माझ्या प्रिय सखीला पोहोचवण्याची विनंती तुला करतो आहे. तुला यक्षांच्या अलकानगरीमध्ये जायचे आहे. तिच्यामधले महाल, वाडे, बाहेरच्या उद्यानात असलेल्या शंभूशीर्षांवरील चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघाले आहेत.

मराठी काव्यानुवाद- (वृत्त-मंदाक्रान्ता)
१) ।। संतप्तांचा अससि जलदा आसरा तू, निरोप कांतेला दे
विरह घडवी आमुचा स्वामिकोप
यक्षेशाचे नगर अलका तेथ जा सौध जेथ
बाह्य़ोद्यानी वसत हरचंद्रिका द्योतवित।। 
(चिंतामणराव देशमुख)

२) तप्तांची तू कणव जलदा! प्रीती संदेश देई
स्वामीक्रोधें सखि विलग मी पोळतो येथ पाही
यक्षेशाच्या नगर अलकेजा जिथें ‘हम्र्यकेन्द्रे’
बाह्य़ोद्यानी हर उजळूनी क्षालितो भालचंद्रे।।
(बा. भ. बोरकर)

३) संतप्तांना निरविशी क्षेम सांगे प्रियेस
दूरप्रान्ती विरहि पडलो क्रूद्ध होता धनेश
यक्षेशाचि नगरी अलका गांठली पाहिजेस
पाही तेथे धवलित उमानाथ चंद्रे निवास।।
(पंडित ग. नि. कात्रे)

४) निवारा तू जलद व्यथितां ने निरोप प्रियाते
स्वामीशापे सखिविरह मी साहतो फार कष्टे
जायाचे तूं नगरि अलका धाम यक्षेश्वरांचे
बाह्य़ोद्यानी धवलि इमले चंद्रमाथी शिवाचे।।
(अ. ज. विद्वांस)

५) बाह्य़ोद्यानी शिव-शशिकरें दीप्त ते हम्र्य जेथे
यक्षेशाची वसति अलका, जायचे जाण तेथे
तप्तां देशी उपशम तसा तू मदीयें निरोपे
जा मत्कान्तेप्रति विघटनें दूर मी स्वामीकोपे।।
(द. वें. केतकर)

हाच संस्कृत श्लोक आज मी निवडला. कारण या श्लोकाचा शेवटचा चरण हा सतरा अक्षरांचा संधी व समास यामुळे झालेला एकच शब्द आहे. संस्कृतमध्ये संधी व समास यामुळे शब्दसंकोच करून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करता येतो. अशी सोय मराठीत नसल्यामुळे असा दीर्घ सामासिक शब्दांचा तेवढय़ाच अक्षरांत अनुवाद करायचा म्हणजे अनुवादकर्त्यांची खरी कसोटी लागते. उपरोक्त पाच अनुवादकांनी या चरणाचा अनुवाद कसा चातुर्याने केला आहे ते पाहणे मनोरंजक होईल.

देशमुखांनी ‘सौध जेथ’ हे शब्द तिसऱ्या चरणात घेतले व बाकीचा आशय शेवटच्या चरणात पुरा केला. बोरकरांनीसुद्धा ‘हम्र्य केन्द्रे’ हे शब्द आधीच्या ओळीत घेतले आहेत. कात्रे यांनी ‘पाही तेथे धवलित उमानाथ चंद्रे निवास’ असा गोळाबेरीज अर्थ दिला आहे. विद्वांस व केतकर यांनी याच चरणाचा पूर्ण अर्थ एकाच चरणात अनुवादित केला आहे. मूळ शब्द ‘हम्र्य’ याचा अर्थ श्रीमंतांचे निवासस्थान; जसे- महाल, वाडा, सौध, इमला. बोरकर व केतकर यांनी हा शब्द तसाच ठेवला आहे. तो मराठीत तितकासा प्रचलित नाही व क्लिष्टही वाटतो. देशमुख व विद्वांस यांनी अनुक्रमे ‘सौध’ व ‘इमले’ हे शब्द योजले आहेत, तर कात्रे यांनी नुसते ‘निवास’ एवढय़ावरच काम भागवले आहे. बोरकर यांचा अनुवाद ‘हर उजळुनी क्षालितो भालचंद्रे’ हा मूळ अर्थापासून थोडा दूर गेल्यासारखा वाटतो.

तसे पाहिले तर हे सर्वच अनुवाद उच्च दर्जाचे व जवळजवळ समकक्ष आहेत. तरीसुद्धा व्यक्तिश: मला देशमुख व विद्वांस यांचे अनुवाद अधिक सरस वाटतात. अर्थात, रसिकांमध्ये यासंबंधी मतांतरे असतील व ते स्वाभाविक आहे. कारण ही निवड वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ आहे. स्वत: कालिदासानेसुद्धा ‘रघुवंशा’मध्ये ‘भिन्न रुचिर्हि लोक:’ असे म्हटलेच आहे.

लोकसत्ता १७ जुलै २०११ "जाणीव " लोकरंग पुरवणीतून  साभार

No comments:

Post a Comment